तिच्या मनातील तळमळ – उंच भरारी | Tichya Manatil Talmal – Unch Bharari | Marathi Lekh
समाज आणि बंधन
ती आता किशोरवयीन झाली होती. तिला आता थोडी थोडी समजाविषयी जाणीव आणि जबाबदारी समजू लागली होती. समाजाकडून असलेल्या अपेक्षा ती आता समजू शकत होती. पण तिच्या मनामध्ये सतत घोळत असणारी तळमळ तिला सतावत होती. ती म्हणजे मुलींविषयी समाजामध्ये असणारी प्रतिमा. ती मध्यम ग्रामीण भागात वाढलेली कन्या असलेने तिला अनेक गोष्टींचे समाजाकडून उत्तर हवं होतं. जसे की, मुलींनी नेहमी हळुवार आवाजात बोलाव, मुलींनी नेहमी नाजुक असाव, मुलींनी जास्त बाहेर फिरू नये, मुलींनी मुलांशी संपर्क तितकाच ठेवावा, मुली नेहमी घरातच बऱ्या, मुली म्हणजे परक्याच्या घरचे सोनं (लग्नाअगोदर) अशा कितीतरी गोष्टी तिला आता बैचेन करू लागल्या.
तिची एक मैत्रीण होती जी तिच्या आईवडिलांची एकुलती एक आणि खूप लाडकी होती. तीचे तिच्या घरी खूप प्रेम केले जायचे तीचे वडील तिला कधीच मुलांपेक्षा कमी समजत नव्हते तर मुलांपेक्षा माझी मुलगी किती वरचढ आहे हे ते समाजाला नेहमी पटवून देत असत. त्यामुळे आपल्या मैत्रिणीबद्दल तिला एक वेगळेच आकर्षण वाटत असायचे. आपली मैत्रीण किती सुंदर जीवन जगते आहे याचे तिला नेहमी अप्रूप वाटायचे.
कुटुंबातील परिस्थिति
आपल्या कुटुंबात असणारे तिच्याबद्दलचे विचार तीचे मन नेहमी खात असायचे. आईवडिलांना असणाऱ्या चार अपत्यामध्ये ती तीन नंबरची मुलगी होती. तिच्यापेक्षा दोन मोठ्या बहिणी होत्या तर एक लहान भाऊ तिच्या पाठोपाठ होता. त्यामुळे तीचे लाड कधीच तिच्या आईवडिलांनी केले नव्हते. लाड होत होते ते सर्वात छोट्या मुलाचे आणि मुलगा असल्याने त्याच्याबद्दल आईवडिलांच्या मनात एक वेगळीच विलक्षण ओढ होती. आणि त्यामुळे ती नेहमी दुःखी असायची. आपणाला जर अशी वागणूक मिळायची होती तर का मला माझ्या आईवडिलांनी जन्म दिला? का मला हे जग पाहावयास त्यांनी भाग पाडले? का माझ्याशी असा अन्याय केला? या प्रश्नात ती नेहमी गुंतत चालली होती.
तिला आधार होता तो तिच्या मोठ्या बहीणीचा. बहीण म्हणजे दुसरी आईच असते याचा तिला प्रत्यक्षाने बोध होत होता. ती नेहमी आपल्या सर्वात मोठ्या बहिणीला मनातील सर्व सांगे, ती तिच्या मिठीत मन मोकळेपणाने रडत असे. ती तिच्यावर आपला हक्क सांगत असे. ती तिलाच आपला भाऊ, आपले आईवडील समजत असे. पण आता तिच्या बहिणीचे लग्न झाले होते त्यामुळे ती परत परकी झाली होती. तिच्या मनाची तळमळ आता वाढतच चालली होती. ती आता जास्तच अस्वस्थ होत चालली होती. तिला आता खऱ्या अर्थाने मानसिक, भावनिक आधाराची गरज होती.

जिवलग मैत्रिणीचा आधार
आता तीने आपल्या वयाची १८ वर्षे पार केली होती. त्यामुळे ती आता खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती. आपल्या दोन्ही बहिणीपेक्षा बहीणींपेक्षा ती आता अधिक सुंदर दिसत होती आणि त्याहून तिचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि समजूतदार असलेने साहजिकच तिच्याबद्दल सर्वांना एक वेगळेच आकर्षण वाटत होते. ती हुशार असलेने सर्वजण तीचे अगदी मनापासून कौतुक करत होते. तिच्या मैत्रिणीचे वडील तर तिला स्वतःची मुलगीच समजत होते. आपल्या मुलीसोबत तिच्याही इच्छा आकांक्षा ते जाणून घेत होते. तिच्या शिक्षणासाठी तिला प्रोत्साहन देत होते. तीचेही आपल्या मुलीसोबत लाड पुरवत होते. तशी ती त्यांच्याकडे कोणता हट्ट करत नव्हती पण आपल्या मुलीचे हट्ट ओळखून ते तिलाही आपलीच मुलगी समजत असलेने तिला न सांगताच तिला आपल्या मुली प्रमाणे शॉपिंग करून देत होते. ती आपल्या स्वतःच्या आईवडिलांपेक्षा त्यांची आता अधिक ऋणी होत चालली होती. ती त्यांना आता स्वतःचे आईवडीलच मानत होती.
तिच्या मनातील तळमळ – जीवघेणी
झालेतर एक दिवस ती घरी रात्रीचे जेवण करत असताना तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाचा प्रस्ताव तिच्या आईसमोर मांडला तिची विचारपूस न करता तीचे मत काय आहे हे न विचारता. कारण त्यांनी जो मुलगा तिच्यासाठी वर म्हणून सुचवला होता तो दूसरा तिसरा कोणी नसून तिचा आतेभाऊ होता. आणि त्यांनी त्यांना शब्द दिला होता की माझी मुलगी माझ्या बहिणीच्या मुलालाच मी देणार. आणि त्यांचा तो अंतिम निर्णय होता. तसा तो मुलगा तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता आणि दिसायला तर अजिबात चांगला नव्हता. तिच्यासाठी तर तो योग्यच नव्हता. त्या दोघांची जोडी अजिबात शोभून दिसत नव्हती. पण तिच्या देखणेपणावर भाळल्यामुळे त्याला काहीही करून तिला मिळवायचे होते आणि त्यामुळे तो तिच्या आईवडिलांना म्हणजेच आपल्या मामा-मामी ना भावनिक आव्हान करत होता. त्यांना इमोश्नल ब्लॅकमेल करत होता. आणि त्याच्या जाळ्यात आता तीचे आईवडील पूर्णपणे फसले होते.
आपल्या सुंदर, सोज्वळ, सुशिक्षित, मनमिळावू मुलीबद्दल त्यांना कधीच प्रेम नव्हते. तिच्या आशा आकांक्षा कधीच त्यांनी जाणून घेतल्या नव्हत्या. कधीच तिला त्यांनी प्रेमाने जवळ घेतले नव्हते. कधीच तिला त्यांनी काय पाहिजे काय नकोय याची चौकशी केली नव्हती. कधीच त्यांनी तिला आपलेसे केले नव्हते, मग त्यांना तिच्या भावना कशा समजू शकणार. त्यांना कसे समजू शकणार की आपल्या सुंदर, सुसंस्कृत मुलीसाठी हा मुलगा योग्य नाही. आपण आपल्या मुलीचे नुकसान करत आहोत. आपल्या स्वतःच्या मुलीच्या भविष्याचे घोर पतन करत आहोत.
आतापर्यंतच्या आयुष्यातून क्षणाक्षणाला खस्ता खालेल्या तिच्या निर्जन मनाला आता काहीच सुचत नव्हते. आपल्या मोठ्या बहिणी समोरही ती काय बोलू शकत नव्हती कारण तिच्या बहिणीला माहीत होते की, काहीही झाले तरी आपले आई वडील आपले काहीएक ऐकणार नाहीत. त्यामुळे तिच्या मनाची तळमळ दिवसेंदिवस वाढत चालली होती. आणि त्या तळमळीत ती आता बेभान होऊन सैरावैरा भटकत चालली होती. ज्याचा अंत तिला काहिकेल्या लागत नव्हता.
तिच्या मनातील तळमळ – मनातील सुप्त विचार
अशातच एक दिवस ती नेहमी प्रमाणे कॉलेज ला जात असता तिला कोणीतरी आपल्या मागून येत असल्याचे जाणवले. ती काही काळ स्तब्ध थांबली तेव्हा तिला मागून कोणीतरी हाक मारलेचे जाणवले. तीने वळून मागे एक कटाक्ष टाकला तेव्हा तिला कळून चुकले की, तो दूसरा तिसरा कोणी नसून तिच्या वरच्या वर्गात शिकत असलेला तिचा Senior होता. जो कित्येक दिवस झाले तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याशी गप्पागोष्टी करण्यासाठी झटत होता. तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत होता. तिला आपलेसे करण्याचा प्रयत्न करत होता. पण तिच्या स्वतःच्या दुनियेत ती नेहमी वावरत होती आणि आपल्या मैत्रिणी सोबत ती आपला वेळ घालवत होती.
तिच्या मनामध्ये असणाऱ्या मुलांबद्दल च्या चुकीच्या समजुतीमुळे ती कोणत्याही मुलाच्या संपर्कात येण्याचे टाळत होती. कारण तिचा असा समज झाला होता की, आईवडिलांना फक्त मुलेच प्यारी असतात. फक्त मूलच आईवडिलांचा सांभाळ करू शकतात, त्यांना आपलेसे करू शकतात. आणि मुली या नेहमी दुय्यम स्थानावर ठेवल्या जातात. आणि या भ्रामक समजुतीमुळे तिला मुलांबद्दल अक्षरक्षा चीड येत होती. मुलांबद्दल काहीसा तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला होता. कारण तिच्या घरी तिच्या भावाचे होणारे लाड आणि आपला होणारा तिरस्कार सतत तिच्या डोळ्यासमोर उभा राहत होता.
आणि त्यामध्ये एक गोष्ट घडली होती की, तिची सर्वात आवडती, ती जीच्यावर जिवापाड प्रेम करत होती, जिचे तिच्यापासून पान हलत नव्हते अशी तिची जिवलग मैत्रीण तिच्यापासून आता दूर लोटली होती. कारण तिच्या मैत्रिणीचे वडील सरकारी नौकरी करत असलेने त्यांची बदली दुसऱ्या राज्यात झाली होती त्यामुळे त्यांना तिकडे शिफ्ट होणे गरजेचे होते. त्यामुळे ती आता पूर्णपणे परकी झाली होती. तीचे मन तिच्या मैत्रिणीच्या ओढीने अधिकच पाघळत चालले होते. कारण तीच तिचा एकमेव आधार होती जी तिच्या हक्काची होती.., जी तिला समजून घेणारी होती.., जी तिला काय पाहिजे काय नको याची तत्परतेने चौकशी करणारी होती.., जी तिला स्वतच्या बहिणी प्रमाणे वागवत होती.., जी तिला कशाचीही उणीव भासून देत नव्हती.., जी तिची सर्वकाही होती.. आणि त्यामुळे तिच्या मनातील तळमळ अधिकच वाढत चालली होती. ज्या तळमळीत तिच्यावर होणारे अत्याचार दडले होते, ज्या तळमळीत तिच्या मैत्रिणीचे प्रेम तिला अधिकच आपल्याकडे ओढत चालले होते, ज्या तळमळीत तिला स्वतःचे भान हरवलेचे प्रत्यक्षाने जाणवत होते.
तिच्या मनातील तळमळ – मनाची ओढ घेणारी
मग झालेतर तीने काहीवेळ त्याच्या बोलवण्याकडे दुर्लक्ष केले आणि सरळ ती आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मनामध्ये आता आशेचे विविध तरंग उमटू लागले. तिला आयुष्यात पहिल्यांदा कुणा मुलाबद्दल आकर्षण वाटू लागले. तिला आयुष्यात पहिल्यांदा कुणा मुलाबरोबर बोलावेसे वाटू लागले. पण तिने ते जाणीवपूर्वक टाळले. दुसऱ्या दिवशी परत तो मुलगा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पण यावेळी तिच्या मनाची तळमळ तिला रोखू शकत नव्हती ती तिला सांगत होती; का तू स्वताला त्याच्यापासून सावरत आहेस..? का तू त्याला टाळत आहेस..? का तू त्याची इतकी परीक्षा घेत आहेस..? का त्याला एकदा तरी संधि देत नाहीयेस..? निदान त्याच्या मनात काय आहे हे तरी जाणून घे….
तिने धाडस करून त्याला प्रतिउत्तर दिले.. तू का मला सतत बोलवत असतोस.., तू का माझ्या सतत माग लागतोस.., तुला काय दुसरी कामं नाहीत काय..? बरं बोल काय बोलणार आहेस लवकर, मला जास्त वेळ नाही.. तेव्हा तो इतकंच बोलला की, मला तुझा सहवास हवा आहे, जो सहवास तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा, तुला जाणून घेण्याचा, तुझ्यासोबत फेरफटका मारण्याचा असावा. ती क्षणभर तशीच थांबली तिला काहीच समजेना की, याला प्रतिउत्तर काय द्यावे.. ती क्षणभर गोंधळात पडली आणि सरळ तिथून निघून गेली.
तिच्या मनातील तळमळ – प्रेम लहरी
आता तिच्या मनाची तळमळ आणखीनच वाढली. त्या तळमळीने आता प्रेमाचे स्वरूप घ्यायला सुरुवात केली. जी तळमळ आता तिला अधिकच आल्हाददायी वाटू लागली.. जी तळमळ तिला अगतूकच हसवू लागली.. जी तळमळ आता तिला हवीहवीशी वाटू लागली.. ती आता विचार करू लागली की, एकदा बोलून तरी पहावं त्याच्याशी जो इतके दिवस आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, जो इतके दिवस आपल्या फक्त दिसण्यासाठी इतका उतावळा होतोय, जो फक्त आपला सहवास लाभन्यासाठी इतका खटाटोप करतोय. तिने आपल्या मनाची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज ला नेहमीप्रमाणे जायला निघाली.
कॉलेज च्या कॅम्पस मध्ये आल्यानंतर तिच्या अचूक नजरेने त्याला घेरले पण न बघितल्याचे त्याला तिने भासवून दिले. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आगतिकता होती. तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले होते. ज्या चेहऱ्यावर नेहमी गंभीरतेचे भाव उमटत होते त्या चेहऱ्यावर आज प्रेमाचे तरंग उमटत होते.., ज्या मनाला कुणाच्या तरी आधाराची गरज होती तो आधार तिला मिळाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आणि त्याने ते अचूक जाणले होते. तो जसजसा तिच्या जवळ येत होता तसतशी तिच्या हृदयाची धडधड अधिकच वाढत चालली होती, जी धडधड तिला आपल्या हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवून देत होती. तिच्या मनातील तळमळ अधिकच वाढत चालली होती पण यावेळी ती तिला हवीहवीशी वाटत होती.
झालेतर तो समोर आला तेव्हा तिला काहीच सुचेना की, आता काय बोलावे? पण तिची कोंडी त्याने सोडवली तो हळुवार स्वरात बोलला.. काय विचार केलीस माझ्या म्हणण्यावर? तेव्हा ती थोडीच हसली आणि तिथून निघून गेली. जणूकाय त्याला सांगून गेली की, तुलातर मी कालच सांगून गेले होते की, मलाही तुझा सहवास हवा आहे.
तिच्या मनातील तळमळ – निर्णय
कॉलेज सुटले आणि त्या दोघांची भेट झाली. तिने आता स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते.., तो जे सांगेल ते ती आता ऐकणार होती.. त्याने तिला एका मोकळ्या एकांत जागी नेले जिथे त्या दोघांशीवाय कोणीच नव्हते. तो बोलू लागला, मला सुरुवातीपासून तू हवीहवीशी वाटत होतीस. माझ्या मनात सुरुवाती पासून तुझ्याबद्दल प्रेम होते. मी माझ्या हृदयाचा एक कप्पा सुरुवातीपासून तुझ्यासाठी रिक्त ठेवला आहे. मला तू हवी आहेस. मला तुझी जीवनभरासाठी साथ हवी आहे. मी माझ्या घरी पण सांगून ठेवले आहे की, माझी जर कोणी जीवनसाथी होणार असेल तर ती फक्त तू असशील. आणि माझ्या घरच्यांना पण तू आवडतेस. तुझ्यावर मी काही जबरदस्ती करणार नाही, तुझ्या मताशी तू स्वतंत्र आहेस. तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल अगदी तू मला नकार दिलास तरी तो माझ्यासाठी आनंदच असेल.
तुझा निर्णय हा तुला घेण्याचा सर्वस्वी अधिकार असेल. तुझे शिक्षण पूर्ण करून तुला काहीही करण्याचे स्वातंत्र्य तुला असेल. तू फक्त बायको नसशील तर तुला घराचा सर्वाधिकार असेल. म्हणून तू जेव्हा माझ्या घरी येशील तेव्हा तू माझी पत्नी म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून घरी येशील हे माझ्या आईवडिलांनी पहिलाच मला सांगितले आहे. त्यामुळे तुझा निर्णय सर्वस्वी तुझ्या हाती आहे.
तिच्या मनातील तळमळ – उंच भरारी
आता तिच्या मनाच्या तळमळीने आपले एक वेगळेच रूप घेतले होते. जे तिने आजीवन कधी अनुभवले नव्हते ते जीवन जगण्याची संधी तिच्याकडे आता धावून आली होती. ती आता स्वच्छंदपणे आपले जीवन जगणार होती. ना कुणाचा द्वेष, ना कुणाचा तिरस्कार ती आता फक्त आपल्यासाठी जगणार होती. तिला त्याच्या घरच्यांची जाणीव होती कारण तिच्या बहिणीकडून तिने त्यांच्याबद्दल खूप कौतुकास्पद ऐकले होते आणि त्यामुळे तिला त्याच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास होता.
त्यामुळे ती आता मोकळी झाली होती.. ती आता हलकी झाली होती.. तिला आपल्या शरीरावर पंख फुटलेचे जाणवत होते ज्यांच्या आधारे ती आकाशात उंच भरारी घेऊ पाहत होती. तिच्या मनातील तळमळ आता मोकळी होत चालली होती आणि तिला आपल्या एका आशावादी भविष्याचा मार्ग ती आता खुणावत होती. जीवनभर झालेल्या यातनेतून ती आता मुक्त होणार होती. कदाचित हे आपल्या आत्तापर्यंत केलेल्या सत्कर्माचे फळ तर नाही ना याचे भान तिला आता होत होते. तीचे मन आता आणखीनच सुखावत होते.
ज्या आईवडिलांनी जीवनभर तिचा तिरस्कार केला, तिला कधी आपले मानले नाही, त्यांना सोडायला तिला आता तीळमात्रही दुःख होत नव्हते उलट तिला आनंद होत होता की, जे आईवडील तिला दुःखाच्या दरीत लोटू पाहत होते त्या दरीत पडण्यापासून तिची आता सुटका झाली होती. ती आता दरीत खोलवर न जाता आकाशात उंच भरारी मारणार होती.
अशी भरारी जी तीचे आयुष्य आनंदाने भरून टाकणारी होती.., अशी भरारी जी तिच्या जिवलग मित्रिणीला सुटकेचा विश्वास देणारी होती.., अशी भरारी जी तिच्या आईसमान असणाऱ्या बहिणीच्या ममतेचे सार्थक ठरणारी होती.., अशी भरारी जी उंचच उंच आकाशाला भेदणारी होती.., अशी भरारी जी आजीवन आलेल्या यातनांना कुठेतरी पूर्णविराम देणारी होती.., अशी भरारी जी तिच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी होती.., अशी भरारी जी तिच्या जीवनात नवचैतन्य भरून टाकणारी होती.., अशी भरारी जी तीचे जीवन सार्थक ठरवणारी होती.., अशी भरारी जी तिला सतत उंच आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी बांधणारी होती…
इतर साहित्य
आपणाला जर अशा प्रकारच्या आणखीन मनाला स्पर्श करून जाणाऱ्या गोष्टी वाचायच्या असतील तर आपण माझे E-Book वाचू शकता जे आपल्याला Amazon Kindle वर मिळून जाईल. किंवा खाली दिलेल्या Link वरुण आपण ते पुस्तक खरेदी करू शकता. धन्यवाद!
सुंदर Marathi Lekh : परिस्थिति किंमत 5 रुपयाची



