दिवाळीचे दिवस होते त्यामुळे रात्र थोडी लवकरच होत होती. साधारण रात्रीचे ७ वाजले होते. मी बाइक वरुण गावी जात होतो. ओसाड रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा शेती, निस्तेज शांतता, आणि त्या शांततेत थंडीची मोहक चुणूक.
झालेतर मी थोडे अंतर गेलो तेव्हा मला रस्त्याच्या कडेला एक व्यक्ति चालत जात असलेली दिसली. वय साधारण ४५ वर्षे, दोन्ही हातात दोन पिशव्या, कपडे थोडे मळकट आणि मागच्या बाजूला फाटलेले, वर्ण सावळा, केस भिरकटलेले, डोळ्यामध्ये एक प्रकारची तळमळ, जी परिस्थितीची जाणीव करून देणारी. पायांमध्ये फाटके चप्पल, अशी ती व्यक्ति एकटीच रस्त्याच्या बाजूने चालली होती.
ना कुणाच्या गाडीला ती हात करत होती ना कुणाला लिफ्ट मागण्यासाठी धडपड. ती व्यक्ति तिच्याच नादात चालत होती. बहुतेक परिस्थितीने मांडून ठेवलेल्या भयाण अंधकारात ती व्यक्ति स्वतःचा रस्ता स्वतःच शोधत होती. तिच्यापुढे अंधार तर होताच पण ती व्यक्ति त्या अंधारातून आपला मार्ग काढत प्रवास करत होती. तिच्या आतील अंधकारात ती स्वतःला हरवत चालली होती. कदाचित घरच्या जबाबदरीने ती व्यक्ति त्रस्त झाली असावी किंवा घर सुरळीत चालण्यासाठी त्या व्यक्तीचा आटापिटा चालला असावा.
दिवाळीच्या दिवसात घरच्या जबाबदारीने ती व्यक्ति व्याकुळ झाली असावी अथवा मुलांच्या प्रमापोटी घायाळ झाली असावी. मुलांच्या हौसेपोटी ती व्यक्ती तिचे सर्वस्व पणाला लावत असावी आणि त्यासाठी ती सर्व काही करण्यास राजी झाली असावी, आणि या अट्टाहासात ती तीच्याच नादात स्वतःला सावरत चालली असावी.
थोडे अंतर चालत गेल्यावर त्या व्यक्तीला पायातील चपलामुळे चालण्यास अडथळा जाणवू लागला कारण त्या व्यक्तीचे चप्पल फाटले होते त्याने ते चप्पल तिथेच फेकून दिले आणि अनवाणी पायांनी ती व्यक्ती आता चालू लागली. परिस्थितीच्या अचाट निद्र छायेने ती व्यक्ती आता अफाट चालत सुटली होती. त्या व्यक्तीला ना खडे टोचत होते ना अंधाराची भीती वाटत होती. ती तिच्यात नादात आता चालत सुटली होती.
स्वतःच्या अंगावर जरी फाटकी कपडे असली तरी ती व्यक्ती तिच्या मुलांसाठी नवीन कपडे घेऊन चालली होती आणि त्याच्यामधेच त्या व्यक्तीला आपण स्वतः नवीन कपडे घेतल्याचे समाधान वाटत होते. तिला आपल्या मुलांचे समाधान हे आपले समाधान वाटत होते. स्वतः जरी फाटके कपडे, फाटके चप्पल घातले तरी त्या व्यक्तीला त्यामध्ये काहीच संकोच वाटत नसावा पण आपल्या मुलांना दिवाळीत नवीन कपडे मिळावीत यासाठी त्या व्यक्तीचा खटाटोप चालला असावा.
प्रत्येक व्यक्ती ही आपल्या साठी कमीच जगत असते पण आपल्या स्वकियांसाठी ती आपले आयुष्य समर्पित करत असते. कधीकधी तिला त्यामध्ये अपयश येते पण ती व्यक्ती त्यातून कोणता ना कोणता मार्ग काढत आपल्या स्वकियांची इच्छा पूर्ती करत असते.
काही जणांना परिस्थिती साथ देत नसते त्याची कारणे ही वेगवेगळी असतात. काहींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत असते तर काही जणांची परिस्थिती त्यांना कामासाठी कमी वयात परावृत्त करत असते. काही जण स्वतःच्या चुकीमुळेच गरीब राहत असतात तर काहीजण स्वतःच्या घोडचुकी मुळे गरीब झालेले असतात.
पण माणसाची परिस्थिती ही माणसाची जगण्याची रीत ठरवत असते. पैशांच्या अभावाने कित्येक लोकांना आपल्या मूलभूत गरजा ही भागवता येत नसतात. त्यांच्या मुलांना इतर मुलांप्रमाणे जगता ही येत नसते आणि या दुर्दशेमुळे त्या मुलांची मानसिकता ढळली जात असते. त्यांना प्रत्येक गोष्टींमधे कमीपणा जाणवू लागतो आणि आपली परिस्थिती का अशी झाली किंवा आहे या विचाराने त्या मुलांचे मन त्रस्त होत असते.
खरचं माणसाची परिस्थिती माणसाची किंमत ठरवत असते आणि ती किंमत त्या व्यक्तीचे स्थान ठरवत असते. अगदी त्या चालत जाणाऱ्या व्यक्तीप्रमाणे, आणि म्हणूनच सर्वांची दिवाळी एकसारखी नसते. प्रत्येकाची दिवाळी ही प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असते आणि ती दिवाळी त्या व्यक्तीची परिस्थिती ठरवत असते…..