तो राहणारा महाराष्ट्राचा. साधारण उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो आपल्या राज्याबाहेर पहिल्यांदा गेला होता. दोन राज्ये पार करून तो तामिळनाडू च्या प्रवासासाठी निघाला. बसमधून प्रवास करत असता त्याला बसमध्ये एक युवती भावली. केसांमध्ये गजरा, पंजाबी ड्रेस, साधारण गोरा वर्ण, पाहताच क्षणी मनाला भावेल असा तरतरीत चेहरा, शरीराची सुबक बांधणी यांमुळे ती अधिकच प्रभावी आणि आकर्षित करणारी दिसत होती. तो ज्या सीटवर बसला होता त्या सिटच्या बाजूला ती उभारली होती कारण बसमध्ये बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. तो ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा होता त्यामुळे त्याच्या मनामध्ये साहजिकच खळबळ उडाली होती. तिच्याकडे तो अधूनमधून पाहत होता आणि तिनेही ते अचूक वेधले होते. ती पण त्याच्याकडे पाहत होती पण त्याला न कळावे असे.
थोडे अंतर गेले व त्याच्या कडेचा व्यक्ति बसमधून उतरण्यासाठी उठला तशी त्याच्या मनामध्ये अधिकच उत्सुकता होऊ लागली. तो तिच्याकडे पाहण्याच्या अगोदरच ती त्याच्या बाजूला येऊन बसली. ती बसताच क्षणी त्याच्या शरीरामध्ये एक वीज संचारावी तशी आगतूक होऊन गेली. तो अलगद आपल्या जागेपासून तिच्या बाजूला सरकला. ती पण त्याला सकारात्मक प्रतिसाद देत होती. तिच्या केसांमधील गजऱ्याच्या सुगंधामुळे तो अधिकच वेडा होत चालला होता. तिने तिच्या पर्समधील मोबाइल बाहेर काढला आणि कुणाशीतरी मेसेज द्वारे बोलू लागली.
तिच्याकडूनही थोडा प्रतिसाद मिळत होता पण तो काही बोलू शकत नव्हता कारण भाषेची मर्यादा. तो मराठी भाषिक आणि ती तमिळ. मग दोघांचे संभाषण कसे होणार त्यामध्ये भर ही की, हिंदी भाषेबद्दल त्या लोकांमध्ये काय समज आहे काय माहीत. ते लोक हिंदी बोलतच नाहीत. मग आता त्याच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहिला की तिच्याशी बोलायचे कसे? तिच्याकडून किमान मोबाइल नंबर तरी मिळावा. तो त्यासाठी कोणतीतरी आयडिया शोधण्यामध्ये दंग झाला आणि त्या विचारामध्ये तो बुडून गेला. त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की तिला इंग्लिश मधून नंबर मागावा आणि तो त्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवू लागला. तिच्याबरोबर बोलण्यासाठी धाडस एकटवू लागला. आणि तो आपल्या मनाचा निर्धार पक्का करून तिच्याशी बोलणार तितक्यात तिचा बसस्टॉप आला आणि ती बसमधून उतरण्यासाठी उभी राहिली आणि दरवाज्याकडे जाऊ लागली. तो तिच्याकडे पाहत राहिला आणि ती बसमधून उतरली. तो तिच्याकडे बसच्या खिडकीमधून पाहू लागला. तिने त्याच्याकडे पाहून एक स्मितहास्य केले आणि ती तिच्या मार्गाकडे निघून गेली.
अनोळखी रस्ता, अनोळखी लोकं, अनोळखी प्रभाग, अनोळखी भाषा यांमुळे त्याला काहीच समजले नाही की आपण कुठे आलो आहोत. बस त्या स्टॉप पासून दूर जाऊ लागली आणि तो तिच्या विचारात मग्न होऊ लागला.
परत कधी त्याचा तिच्याबरोबर संपर्क आला नाही कारण तो त्याचे काम झाल्यानंतर महाराष्ट्रात परतला. आणि ती त्याच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण बनून त्याच्या आठवणींच्या ठेवीत सदैव राहून गेली. तो विचार करत राहिला आणि ती तिथून निघून गेली कायमची त्याच्यासाठी आठवणींचा ठेवा ठेऊन.
तो एक प्रवास आणि ती…..