तो आता विशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला होता. त्याला आता घरच्या परिस्थिती ची योग्य पारख आली होती. घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याचा जीव कासावीस होत होता. वडीलांच्या कष्टाच्या कामाची किंमत आणि त्यातून मिळणारा अत्यंत कमी मोबदला याची त्याला जाणीव होत होती.
त्याचे वडील शेतकरी होते आणि त्यांचा कारखान्यात एक शेअर होता. दिवाळीच्या कालावधीत कारखान्यात शेअर ची साखर दिली जाते. ज्याची किंमत अत्यंत तुरळक असते. साधारणतः १५ ते २० रुपये किलो. झालेतर वडीलांच्या सांगण्यावरून तो शेअर ची साखर आणण्यासाठी शहराकडे रवाना झाला. जिथे कारखाना स्थाईक होता.
घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्याकडे स्वतःची गाडी नव्हती त्यामुळे तो एस टी ने प्रवास करणार होता. खिश्यामधे जेमतेम तिकिटाचे पैसे आणि साखरेला लागतील तेवढेच आणि फक्त १०-२० रुपये चढ अशी पैशाची ठेवण त्याच्याकडे होती. साधारणतः २५ किलोमिटर चा प्रवास करून तो कारखान्याच्या दिशेला पोहोचला.
कारखाना तसा अजून २-३ किलोमिटर दूरच होता. मग तो पाई चालत कारखान्यामध्ये पोहोचला जिथे साखरेचे वाटप सुरू होते. तशी खुप गर्दी कारण दिवाळीमुळे सर्व शेतकरी साखर घ्यायच्या गडबडीत होती. कारण बाजार भावामधे साखरेचा दर खुप होता आणि इथे सामान्य माणसाला परवडेल इतकाच.
झालेतर त्याने सर्व प्रोशीजर आटपून पावती करण्याच्या टेबल कडे आपला धावा घेतला आणि त्यासाठी त्याला ५ रुपये सुट्टे देण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ५ रुपये सुट्टे नव्हते. तेव्हा कॅशियर त्याला बोलला की ५ रुपये घेऊन या तुम्हाला १० रुपये देतो. आता त्याला काहीच समजेना काय करावे कारण कारखान्या जवळ इतर काहीही नव्हते जिथे त्याला ५ रुपये सुट्टे मिळतील.
त्याने परत कॅशीयर कडे विनवणी केली पण तो काहीच प्रतिक्रिया देईना कारण अशा ५-५ रुपयांनी त्यांना सरतेशेवटी काही रुपयांचा नफा होणार होता. पण त्याला त्याची काहीच जाणीव नव्हती. तो आपल्या ५ रुपयांच्या शोधात होता. परिस्थितीने ओढोवलेल्या भयाण वास्तवाकडे तो आता पाहत होता. सकाळपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते.
पैशाच्या असणाऱ्या कमतरतेमुळे तो आता हतबल झाला होता. वडीलांच्या कष्टाच्या जाणिवेमुळे त्याला त्या ५ रुपयात ५०० रुपयांचे प्रतिबिंब डोळ्यासमोर दिसत होते. त्याला आता खऱ्या अर्थाने ५ रुपयाची जाणीव होत होती आणि त्या हक्काच्या ५ रुपयांच्या आशेने त्याचा जीव तुटत होता.
अशाच हतबल तेने तो आता कारखान्यातून आपला पाय काढता घेत होता आणि आपल्या गावाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. त्या ५ रुपयाची किंमत फक्त आणि फक्त त्यालाच भासत होती. ज्याची भरपाई कशाने होईल याचा फक्त तो विचार करत होता. वडिलांना राहिलेले पैसे देताना काय उत्तर द्यायचे याच्या उत्तराच्या शोधात त्याचे डोळे पाण्याने भरले होते आणि त्याचे अश्रू आगतुकच त्याच्या गालावरून ओघळत त्याच्या हातावर पडत होते. जे त्या ५ रुपयाची जाणीव त्याला करून देत होते, त्याचबरोबर परिस्थितीची जाणिव ही त्याला करून देत होते.
जी परिस्थिती कधी बदलेल हे कुणालाच ठाऊक नव्हते. काळाच्या ओघात कुठेतरी त्याचे उत्तर सापडणार होते आणि त्या काळाच्या ओघात तो आता आपली पाऊले टाकत टाकत पुढे जात होता.. आपल्यावर ओढोवलेल्या परिस्थितीचे अवलोकन करत पुढे पुढे सरसावत होता…..